शिक्रापूर: पुणे-अहमदनगर महामार्गावर शिक्रापूरजवळ एका मद्यधुंद तरुणाने काल रात्री (रविवार) अक्षरशः धुमाकूळ घातला. रस्त्यात वाहने अडवून त्याने वाहतूक विस्कळीत केली, तसेच काही वाहनचालकांना किरकोळ मारहाणही केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी स्वतः संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू केली आहे.

काय घडले नेमके?
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश कैलास सुकाळकर (रा. नेवासा फाटा, अहमदनगर) असे या तरुणाचे नाव आहे. दारूच्या नशेत धुंद असलेल्या ऋषिकेशने शिक्रापूरजवळील अहिल्यानगर-पुणे महामार्गावर गोंधळ घातला. त्याने पीएमपीएमएल बसला अडवून तिच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर रस्त्याने जाणाऱ्या अनेक चारचाकी वाहनांना थांबवून त्यांचे दरवाजे उघडण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न केला.

काही वाहनचालकांनी प्रतिसाद न दिल्याने, तो थेट गाडीच्या बोनेटवर बसून वाहने थांबवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या या विचित्र आणि धोकादायक कृत्यांमुळे रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्नही केला. या गोंधळामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच, शिक्रापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ऋषिकेश सुकाळकर याला ताब्यात घेऊन शिक्रापूर पोलीस ठाण्यात आणले. त्याची नशा उतरल्यानंतर, त्याला रात्री घडलेला कोणताही प्रकार आठवत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, या तरुणाविरुद्ध काही जणांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांकडे धाव घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू आहे.







