डॉ. अशोक बालगुडे

मुंबई: बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांवरून होणारी स्पर्धा बॉलिवूडसाठी नवी नाही. मात्र, दोन मोठ्या चित्रपटांची एकाच दिवशी होणारी टक्कर टाळता आली नाही, तर कलाकारांनाही त्याची खंत वाटते. अभिनेता सलमान खान याने आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांवरून अभिनेत्री श्रद्धा कपूरची जाहीर माफी मागत याचाच प्रत्यय दिला आहे.
सलमानचा ‘मातृभूमी’ आणि श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘ईठा’ हे दोन्ही चित्रपट येत्या ४ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहेत. या प्रदर्शनाच्या तारखांचा मेळ जुळून आल्याने बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची थेट स्पर्धा रंगणार आहे.

‘मातृभूमी’च्या प्रमोशनसाठी सलमान खान आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंह एका खाजगी वृत्तवाहिनीच्या रायझिंग समिट २०२६ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांबाबत विचारले असता सलमानने स्पष्ट केले की, कोणत्याही चित्रपटाशी प्रदर्शनाच्या तारखेवरून संघर्ष करण्याचा आपला हेतू नसतो. ‘ईठा’च्या प्रदर्शनाची माहिती आधी मिळाली असती, तर आपण ४ डिसेंबरची तारीख निवडली नसती, असेही त्याने सांगितले.
सलमान म्हणाला, ‘‘मला याबद्दल वाईट वाटले. श्रद्धाशी मी स्वतः बोललो आणि तिची माफीही मागितली. तिने मात्र दोन्ही चित्रपट चांगले असून प्रेक्षक त्यांना पसंती देतील, असे सांगितले.’’ श्रद्धाच्या चित्रपटाला त्याने शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान, ‘मातृभूमी’मध्ये भारतीय जवानांची कथा मांडण्यात आली आहे, तर ‘ईठा’मधून महाराष्ट्राच्या लावणी आणि तमाशा परंपरेतील ज्येष्ठ कलावंत विठाबाई नारायणगावकर यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘ईठा’चे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे एका बाजूला देशभक्तीची कथा, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या लोककलेचा समृद्ध वारसा, अशी वेगळी विषयवैविध्य असलेली चित्रपटांची लढत ४ डिसेंबरला पाहायला मिळणार आहे.






