ढाका : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मेन्स ब्लाइंड क्रिकेट आशिया कप 2026 च्या अंतिम सामन्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शुक्रवारी (21 नोव्हेंबर) ढाका येथे होणारा हा सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे, पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. मात्र, सामना न खेळताच पाकिस्तानला विजेता घोषित करण्यात आल्याने भारतीय संघाने या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच ट्रॉफी वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकून आपली नाराजी व्यक्त केली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम लढत पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक होते. मात्र, ढाक्यातील खराब हवामानामुळे मैदान खेळण्यासाठी योग्य राहिले नाही. त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विजेतेपद कोणाला द्यायचे, यावरून वाद सुरू झाला.
मिळालेल्या वृत्तानुसार, मेन्स ब्लाइंड क्रिकेट परिषदेच्या तांत्रिक समितीने दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्याबाबत सहमती दर्शवली होती. मात्र, प्रत्यक्षात पाकिस्तानला विजेता ठरवण्यात आले. पाकिस्तानचा नेट रनरेट भारतापेक्षा चांगला असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. भारतीय संघाने मात्र या निकषावर आक्षेप घेतला आहे. सामना झालाच नसताना नेट रनरेटच्या आधारे विजेता ठरवणे योग्य नसल्याचे भारताचे म्हणणे आहे.

या प्रकरणात परिषदेचे अध्यक्ष सुलतान शाह यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. समितीच्या निर्णयात बदल करून पाकिस्तानला विजेता घोषित करण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जात आहे. या आरोपांबाबत स्वतंत्र अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. दरम्यान, भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी वितरण कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला.
भारताच्या क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) ने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. संस्थेचे सचिव शैलेंद्र यादव यांनी वादावर योग्य तोडगा निघेपर्यंत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध भविष्यात सामने खेळणार नसल्याचे स्पष्ट केले.






