पुणे : पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे शिक्षिकेची भररस्त्यात निर्घृण हत्या झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येमागे दुसरे तिसरे कोणी नसून मृत महिलेचा दीर असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मालमत्ता आणि पैशांच्या वादातून त्याने भावाच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी काही तासांतच मुख्य आरोपीला अटक केली आहे.

उज्ज्वला रामदास काकडे (वय 47) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. गुरुवारी (19 नोव्हेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास त्या हडपसर येथील शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. बसस्थानकाकडे जात असताना आरोपीने प्रथम मालवाहू ट्रकने त्यांना धडक दिली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. या हल्ल्यात उज्ज्वला यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला यांचे पती रामदास काकडे यांचे यापूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर पतीने घेतलेल्या पैशांची परतफेड, धनादेश, सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे यावरून दीर शशिकांत काकडे यांच्याशी त्यांचा वाद सुरू होता. याच वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात सासू सुलोचना काकडे यांनीही आरोपीला मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर आरोपी चारचाकी वाहनातून पसार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने त्याचा शोध घेतला. आरोपीने सातारा जिल्ह्यातील शिरवळ परिसरात वाहन सोडून डोंगराळ भागात आश्रय घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सासवड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत शशिकांत माणिकराव काकडे याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






