पुणे : पुण्यातील विमाननगर परिसरात विधानपरिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातील महागड्या वस्तूंवर डल्ला मारला असून, यामध्ये लुई व्हिटॉन कंपनीची चामड्याची बॅग, ईअरपॉड, सूट आणि लिप पेन्सिल यांचा समावेश आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंची एकूण किंमत 90 हजार 916 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्त तनपुरे यांचे विमाननगरमधील लुंकड स्काय व्हिला सोसायटीमध्ये निवासस्थान आहे. घरातील कपाटात ठेवलेली महागडी बॅग जागेवर नसल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले. सुरुवातीला बॅग घरातच कुठेतरी ठेवली असावी, या शक्यतेने शोध घेण्यात आला. यासाठी घरातील मोटारचालक संग्राम तमनेर यांच्याकडेही विचारणा करण्यात आली. तसेच घरात काम करणाऱ्या महिलांकडे चौकशी करण्यात आली.
मात्र, बराच शोध घेऊनही बॅग सापडली नाही. त्यानंतर घरातील इतर वस्तू तपासल्या असता ईअरपॉड, सूट आणि लिप पेन्सिलदेखील गायब असल्याचे आढळले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. 22 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत ही चोरी झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकरणी आमदारांच्या मोटारीवरील चालक संग्राम चंद्रभान तमनेर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे.
आमदारांच्या निवासस्थानीच चोरी झाल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. घरातील वस्तू कोण घेऊन गेले, चोरी नेमकी कशी झाली आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.






