सागर जगदाळे

भिगवण : एकीकडे दुष्काळाचे सावट आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मोल जपण्याचे आवाहन सुरु असताना तक्रारवाडी येथे प्रशासकीय अनास्थेचा नमुना समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक दोनमध्ये गेल्या दीड महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनची गळती सुरु आहे.लिकेज दुरुस्त करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला; मात्र दीड महिना उलटूनही गळतीचा शोध लागला नाही, दुरुस्ती झाली नाही आणि पाण्याची नासाडी मात्र सुरूच राहिली. त्यामुळे प्रशासन गळती शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे की ही प्रशासकीय उदासीनता आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
वार्ड क्रमांक दोनमधील स्वातंत्र्यसैनिक मारुती धुमाळ यांच्या घराशेजारी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनला गळती लागली होती. ती शोधण्यासाठी रस्त्याच्या कडेला खड्डा खोदण्यात आला. मात्र खड्डा खोदल्यानंतरही पाणी नेमके कुठून गळते, याचा शोध संबंधित यंत्रणेला घेता आला नाही. आता या खड्ड्याच्या सभोवताली झाडाझुडपे वाढण्यास सुरुवात झाली असून ती चांगलीच हिरवीगार झाली आहेत. खड्ड्यातील पाण्यानेही हिरवट रंग धारण केला आहे. जणू लिकेज शोधण्याऐवजी त्या ठिकाणी झाडाझुडपांचीच वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दीड महिना उलटूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दूषित पाण्याचा धोका; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा हिरवट रंग आणि त्यावर वाढणारे शेवाळ पाहता पाण्याच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे पाणी पाणीपुरवठा पाइपलाइनमध्ये मिसळत असल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता तपासून सुरक्षित पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. या दीड महिन्यात किती पाणी वाया गेले, याचा हिशेब कोण देणार, असा सवालही नागरिक विचारत आहेत.
प्रशासक विलास बंडगर, ग्रामसेविका अन् पाणी सोडणारे कर्मचारी नेमके करतात तरी काय?
गावाचे प्रशासक विलास बंडगर आणि ग्रामसेविका यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढी गंभीर समस्या दीड महिना प्रलंबित असताना तिची दखल कोणी घेतली? दररोज पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही गळती दिसत नाही का? गळती निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठांना माहिती देणे आणि दुरुस्तीचा पाठपुरावा करणे ही त्यांची जबाबदारी नाही का? संबंधित कर्मचारी नेमके काय काम करतात, असाही सवाल उपस्थित होत आहे. ग्रामसेविका यांना ऑफिसची खुर्ची सुटत नाही प्रत्यक्ष गावात ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी जाऊन कधीच पाहणी करत नाही अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
मतांचे मोल कळते; मग पाण्याचे मोल कधी कळणार गावपुढाऱ्यांचे मौन!
गावातील समस्या सोडविण्यासाठी आणि निवडणुकीच्या काळात मत मागण्यासाठी नागरिकांच्या दारोदारी जाणारे गावपुढारीही या गंभीर पाणीगळतीच्या समस्येकडे कानाडोळा करत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. मत मागण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या गावपुढाऱ्यांना मतांचे मोल चांगलेच ठाऊक असते; मग दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मोल त्यांना का समजत नाही? दीड महिन्यापासून पाणी वाया जात असताना गावातील पुढारी या प्रश्नावर आवाज का उठवत नाहीत? जसे मतांचे मोल त्यांना कळते, तसे पाण्याचे मोल त्यांना कळत नाही का, असा बोचरा सवाल उपस्थित होत आहे.
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा!
प्रशासक विलास बंडगर, ग्रामसेविका शोभा जाधव आणि संबंधित पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी तातडीने गळती शोधून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, खड्ड्यातील पाण्याची स्वच्छता करावी आणि पाण्याची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही तक्रारवाडीतील नागरिकांनी दिला आहे.
दीड महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचे लिकेज शोधता येत नसेल, तर हा तांत्रिक अडथळा आहे की प्रशासनाची उदासीनता? मतांचे मोल जाणणाऱ्या गावपुढाऱ्यांनी आता पाण्याचे मोलही ओळखावे अशी अपेक्षा तक्रारवाडी ग्रामस्थांनी केली आहे.







