पुणे : पुण्यातील मंदिरांमध्ये दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या महादेव गिरमकरला स्वारगेट बसस्थानकावर सापळा रचून पोलिसांनी अटक केली. त्याने अजून दोन मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महादेव तुकाराम गिरमकर हा गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील विविध मंदिरांची पाहणी करून चोरीच्या संधी शोधत होता. दोन दिवसांपूर्वी मुकुंदनगर परिसरातील एका मंदिरात रात्रीच्या वेळी आरोपीने चोरी केली होती.मंदिरात जात, त्याने दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली होती. हा प्रकार मंदिर प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला. त्यानुसार, चोरीनंतर आरोपी स्वारगेट बसस्थानकावर जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी बसस्थानकावर सापळा रचून आरोपीला रोख रक्कमेसह अटक केली.

स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आरोपीने अजून दोन मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. पोलिसांकडून त्याच्याकडून आणखी माहिती घेण्याचे काम सुरू असून, या प्रकरणात आणखी काही मंदिरांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.







