Domain sale : जगभरात इंटरनेट नुकतेच पाय रोवत असताना, १९९३ साली एका १० वर्षांच्या मुलाने घेतलेला छोटासा निर्णय आज अब्जावधींच्या व्यवहारात रूपांतरित झाला आहे. मलेशियातील अर्यान (अर्थान) इस्माईल याने आपल्या आईच्या क्रेडिट कार्डवरून अवघ्या ३०० रुपयांत ‘AI.com’ हे दोन अक्षरी डोमेन नोंदणी केले. त्या वेळी त्याने ‘AI’ ही अक्षरे स्वतःच्या नावातील सुरुवातीची आद्याक्षरे म्हणून निवडली होती.

त्या काळात डोमेन खरेदी ही फारशी परिचित गोष्ट नव्हती. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या मर्यादित होती आणि डिजिटल मालमत्तेचे भविष्यातील महत्त्व कुणालाही पूर्णपणे उमगले नव्हते. मात्र पुढील तीन दशकांत तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. विशेषतः ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे ‘AI’ ही दोन अक्षरे जागतिक स्तरावर सर्वाधिक चर्चेत आली.
याच पार्श्वभूमीवर ‘AI.com’ हे डोमेन अत्यंत मौल्यवान ठरले. लहान, लक्षात राहणारे आणि जागतिक स्तरावर ब्रँड व्हॅल्यू असलेले दोन अक्षरी डोमेन अत्यंत दुर्मिळ असतात. त्यामुळे मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांची या डोमेनवर नजर होती. अखेर एप्रिल २०२५ मध्ये हे डोमेन तब्बल ७० दशलक्ष डॉलर्सना म्हणजेच सुमारे ६०० कोटी रुपयांना विकले गेले. विशेष म्हणजे हा व्यवहार पूर्णपणे क्रिप्टोकरन्सीद्वारे झाला.
या विक्रीमुळे २०१० मध्ये सुमारे ४९.७ दशलक्ष डॉलर्सना विकल्या गेलेल्या Carinsurance.com चा विक्रम मोडला गेला. त्यामुळे ‘AI.com’ हा आतापर्यंतचा सर्वात महागडा सार्वजनिक डोमेन व्यवहार ठरला आहे.
एका लहान मुलाच्या कुतूहलातून सुरू झालेली ही कहाणी डिजिटल युगातील दूरदृष्टीचे उदाहरण बनली आहे. इंटरनेटवरील योग्य नाव, योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि तंत्रज्ञानातील बदल यांची सांगड कशी प्रचंड आर्थिक मूल्य निर्माण करू शकते, याचा हा अनोखा दाखला मानला जात आहे.







