पुणे : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने अंतर्गत युद्धाची तयारी सुरू केली आहे.नागरिकांना सातत्याने युद्ध होणार असल्याने खबरदारी म्हणून काय करायचे याची माहिती देण्यात येत आहे. अशातच आता पुण्याच्या आकाशात सतत विमानाच्या घिरट्या दिसत असल्याने पुणेकरांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय विमानासाठी हवाई क्षेत्र बंद केल आहे. परिणामी, उत्तर भारतातून दिल्ली, लखनऊ व अमृतसर विमानतळावरून उत्तर अमेरिका,मध्य पूर्व, युरोप, पश्चिम आशियातील शहरांना जाण्यासाठी आता महाराष्ट्राच्या व काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्रांचा वापर केला जात आहे. त्यामुळे आकाशात विमानांची संख्या वाढली आहे. तब्बल 200 ते 250 विमान आकाशात घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान हवाई उडाणाचा कालावधी वेगळा असला तरी एक ते दोन तासापर्यंतचा कालावधी वाढला आहे. परिणामी इंधन व मनुष्यबळाचा वापर वाढल्याने येत्या काळात विमान कंपन्या तिकीट दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान या विमान वाहतुकीचा पुणे विमानतळाला किती फायदा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







