Daund Crime: दौंड, ता. 15 : वडिलांच्या उपचारासाठी, गाडीच्या व्यवसायासाठी व कामानिमित्त घेतलेल्या पैशाच्या मोबदल्यात 10 टक्के परतावा देऊन सुद्धा आणखी पैशाची मागणी करून सावकारांनी व्यावसायीकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. ही घटना कुरकुंभ (ता. दौंड) गावाच्या हद्दीत सन 2022 पासुन ते आजपर्यंत वेळोवेळी घडला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात चार खाजगी सावकारांवर खंडणीसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चांगदेव (विजय) सावता बनकर, विनोद बाळासाहेब जाधव, लिंबाजी ढोले (पुर्ण नाव माहित नाही) व दिपक राजाराम पवार (रा. कुरकुंभ ता. दौंड जि पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी दिपक सुधाकर मुंडलीक (वय 37, कुरकुंभ. ता. दौड जि. पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक मुंडलीक यांनी वडील सुधाकर मुंडलीक हे आजारी असताना त्यांच्या औषध उपचारासाठी चांगदेव (विजय) सावता बनकर यांच्याकडुन 10 रुपये टक्का प्रतिमहा दराने 15 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात मुंडलीक यांनी कुराकुंभ येथील राहते घर बनकर यांची सासु सिंधु शंकर जाधव यांच्या नावावर साठेखत करून दिले होते. तसेच महिंद्रा गाडी व दोन कोरे चेक सिक्यूरिटी म्हणून ठेवुन घेतले होते. मुंडलीक यांनी बनकर यांना 40 हजार प्रतिमाह व्याज दिले आहे.
साधारण एक महिन्यांनी मुंडलीक यांनी बनकर यांना 5 लाख रूपये परत रोख स्वरूपात व उरलेल्या व्याजाची रक्कम रोख स्वरूपात दिली आहे. त्यानंतर बनकर यांनी मुंडलीक यांना घर परत नावावर करून दिले. दौंड कचेरी येथे बनकर यांना पुन्हा 5 लाख रूपये रोख स्वरुपात दिले. व राहिलेल्या 5 लाख रुपये रकमेस 20 हजार रूपये व्याज दिले आहे. बनकर यांना गाडीचे कागदपत्र व स्टॅम्प पेपर परत मागितले असता, बनकर यांनी मुंडलीक यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. पूर्ण पैसे दिल्या शिवाय मी कागदपत्रे देवू शकत नाही. असे सांगितले तर लिंबाजी ढोले म्हणाला की, चांगदेव बनकर हे गुंड प्रवृतीचे आहे, त्याच्याकडे रिव्हालयर आहे, त्यांचे पैसे तु लवकरात लवकर देऊन टाक असे सांगून धमकी दिली आहे.
गाडीच्या व्यवसायासाठी पैसे लागत असल्याने फिर्यादी दिपक मुंडलीक यांनी विनोद बाळासाहेब जाधव यांच्याकडून 2 लाख 50 हजार रुपये प्रतिमाह 8 टक्के व्याज दराने घेतले होते. तेव्हा जाधव यांना सिक्युरिटी म्हणून गाडीची एक चावी व दोन कोरे चेक दिले होते. ठरल्याप्रमाणे फिर्यादी दिपक मुंडलीक प्रत्येक महिन्याला 15 ते 20 हजार रुपये प्रतिमाह व्याज रोख व फोन पे द्वारे दिले आहेत. पैसे दिले तरीही विनोद जाधव याने घराजवळ पैशाची मागणी केली.
फिर्यादी दिपक मुंडलीक यांनी लिबाजी डोले याच्याकडून 10 लाख रुपये प्रतिमाह 8 रुपये टक्के व्याज दराने घेतले होते. प्रत्येक महिन्याला 45 हजार रूपये व्याज रोख व फोन पे द्वारे व्याजाची रक्कम वेळोवेळी दिली आहे. त्यानंतर भिशीतून 8 लाख रूपये उचलुन त्यांना मुदद्ल स्वरूपात दिले. तेव्हा त्यांनी आणखी 5 लाख रूपये दे आणी गाडीचे कागदपत्रे घेवुन जा.असे म्हणून शिवीगाळ केली.
दरम्यान, फिर्यादी दिपक मुंडलीक यांनी 30 हजार रुपयांच्या दोन भिशी दिपक राजाराम पवार यांच्याकडे लावल्या होत्या. त्याचा भरणा 60 हजार रूपये इतका दिला जात होता. पवार यांच्याकडून 7 लाख 50 हजार रुपयांची भिशी मुंडलीक यांनी उचलली होती. त्यानंतर दुसरी देखील 7 लाख 50 हजार रुपयांची भिशी उचलली होती. मुंडलीक यांनी फेब्रुवारीपासून भरणा न भरता आल्याने दिपक पवार यांनी रकमेला व्याज लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच पवार दाम्पत्याने फिर्यादी दिपक मुंडलीक यांच्या घरी येऊ. पैसे द्या. नाहीतर आम्ही त्यास दिसेल तिथे मारू. अशी मुंडलीक यांना धमकी दिली आहे.
याप्रकरणी दिपक मुंडलीक यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील चारही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 352, 3(5) महाराष्ट्र सावकारी अधीनियम 2014 चे कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वाघमारे करत आहेत.






