Beed : बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातल्या तिंतरवणी गावात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. गावाजवळच्या तलावात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही बातमी कळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

आज सकाळी काही शेतकरी कामासाठी तलावाकडे गेले असता, पाण्यावर काहीतरी तरंगताना दिसलं. जवळ जाऊन पाहिल्यावर ते एका व्यक्तीचा मृतदेह असल्याचं लक्षात आलं. पाण्यात बराच काळ राहिल्यामुळे मृतदेह फुगलेला आणि कुजलेल्या अवस्थेत होता. हे पाहून शेतकऱ्यांनी तात्काळ चकलांबा पोलीस स्टेशनला माहिती दिली. (beed news)
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह चकलांबा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची अवस्था फारच खराब असल्यामुळे तो किती दिवसांपासून पाण्यात होता, याचा अंदाज बांधणं अवघड आहे.
तपासादरम्यान मृतदेहाजवळ ओळख पटेल असं कोणतंही कागदपत्र किंवा वस्तू आढळली नाही. अंगावरील कपडे आणि शरीरयष्टी पाहता त्या व्यक्तीचं वय अंदाजे 40 ते 50 वर्षांदरम्यान असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यातून मृत्यूचं नेमकं कारण समजणार आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील नागरिक, सरपंच आणि पोलीस पाटील यांना आवाहन केलं आहे की, कोणती व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती असेल किंवा वर्णन जुळत असेल, तर त्यांनी तातडीने चकलांबा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
या घटनेमुळे तिंतरवणीसह शिरूर कासार तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं असून, मृत व्यक्तीची ओळख आणि मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.







