मुंबई : महाराष्ट्रभरात काल दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला. शहरांमधील गल्लीबोळांपासून मोठ्या मैदानांपर्यंत गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचून हंडी फोडण्याचा आनंद लुटला. मात्र, या आनंदाच्या वातावरणाला मुंबई आणि आसपासच्या परिसरात घडलेल्या अपघातांमुळे दुःखाची किनार लाभली आहे.

मानवी थरांवरून खाली पडल्यामुळे झालेल्या अपघातांत मुंबई आणि नवी मुंबई मिळून 2 गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवी मुंबईत थरावरून नियंत्रण सुटल्याने एका 34 वर्षीय गोविंदाला प्राण गमवावे लागले, तर मुंबईतही एका गोविंदाचा अशाच दुर्घटनेत मृत्यू झाला.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये एकूण 306 गोविंदा जखमी झाले आहेत.

रुग्णालयांतील आकडेवारीनुसार:

शहर भाग: 154 जखमी (29 दाखल, 31 उपचाराधीन, 94 डिस्चार्ज), पश्चिम उपनगर: 95 जखमी (9 दाखल, 24 उपचाराधीन, 62 डिस्चार्ज), पूर्व उपनगर: 57 जखमी (11 दाखल, 46 डिस्चार्ज)
यातील 202 गोविंदांना प्रथमोपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे, तर 49 जणांवर गंभीर दुखापतींमुळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परळच्या KEM रुग्णालयात सर्वाधिक म्हणजे 55 जखमींना दाखल करण्यात आले होते. याशिवाय राजवाडी रुग्णालयात 28, नायरमध्ये 25, पोद्दारमध्ये 20 आणि सायन रुग्णालयात 16 गोविंदांवर उपचार करण्यात आले.
मोठ्या पथकांचे अनुकरण करत अनेक लहान पथकांनी योग्य सुरक्षेशिवाय 8 ते 9 थर रचण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे अपघातांची संख्या वाढली. न्यायालयाच्या स्पष्ट बंदीनंतरही अनेक ठिकाणी थरांमध्ये 14 वर्षांखालील लहान मुलांचा समावेश करण्यात आला होता. सुरक्षेच्या या गंभीर उल्लंघनांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे






