पुणे : तंत्रज्ञानाचा गैरवापर करून पुणे महानगर परिवहन महामंडळाची फसवणूक करणाऱ्या एका 20 वर्षीय आयटीच्या विद्यार्थ्याचा कारनामा उघडकीस आला आहे. प्रथमेश लक्ष्मण बोगे (रा. चऱ्होली) असे या तरुणाचे नाव असून, त्याच्याविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,प्रथमेश बोगे या तरुणाने 30 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी भेकराईनगर ते आळंदी बसमधून प्रवास करताना रुबी हॉल स्थानकावर त्याने दैनंदिन पास दाखवला. बस कंडक्टर दत्तात्रय जायभाये यांनी पास तपासला असता, त्या दिवशी पीएमपीने निश्चित केलेला बॅकग्राउंड रंग आणि डिजिटल पासचा लूक वेगळा वाटला. संशय आल्याने त्यांनी त्याला पेमेंटची पावती मागितली, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कंडक्टर जायभाये यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ आगार प्रमुखांकडे तक्रार केली.

कोरेगाव पार्क आणि दिघी पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत प्रथमेशला स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयात बोलावले. पीएमपीच्या आयटी विभागाने त्याच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. माहिती तंत्रज्ञान (IT) शाखेत शिक्षण घेणाऱ्या प्रथमेशला कोडिंगचे चांगले ज्ञान होते. मार्च 2025 पासून त्याने पीएमपीच्या अधिकृत अॅपसारखेच एक बनावट अॅप विकसित केले होते. पैसे नसताना तो या बनावट अॅपवरून स्वतःच दैनंदिन पास तयार करायचा आणि मोफत प्रवास करायचा.

विशेष म्हणजे कंडक्टर दत्तात्रय जायभाये यांनी यापूर्वीही अशा प्रकारे बनावट पास वापरणाऱ्या 5 प्रवाशांना पकडून दिले आहे. अॅपच्या रचनेतील सूक्ष्म फरक आणि डिस्प्लेवरील स्क्रीनच्या हालचालींवरून त्यांनी हा बनावट पास ओळखला. पीएमपीचे सह-डेपो मॅनेजर रामदास विरनक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.






