डॉ. अशोक बालगुडे

पुणे : पाणीटंचाईत टँकरचालकांकडून होणारी कथित अवाजवी दरवसुली रोखण्यासाठी पुणे महापालिका दोन महिन्यांत भ्रमणध्वनीवरून टँकर आरक्षणाची सुविधा सुरू करणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी ही सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा मागील वर्षाच्या याच कालावधीपेक्षा 3.5 अब्ज घनफूटांहून अधिक कमी असल्याचा समोर आलं आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात दहा टक्के पाणीकपात लागू केली असून, दर गुरुवारी पाणीपुरवठा मर्यादित केला जात आहे. या उपाययोजनांतून नऊ महिन्यांत 2.30 अब्ज घनफूट पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट आहे.

शहराच्या जुन्या भागांसह नव्याने समाविष्ट गावांत टँकरची मागणी वाढली आहे. एका टँकरसाठी नागरिकांना 700 ते 1200 रुपये मोजावे लागत आहेत. काही चालकांकडून टंचाईचा गैरफायदा घेतला जात असल्याच्या तक्रारी आहेत. प्रस्तावित सुविधेमुळे टँकरची उपलब्धता, चालकांची माहिती आणि वितरणाचे वेळापत्रक कळू शकेल.
सुस आणि म्हाळुंगे परिसरातील 104 गृहनिर्माण संस्थांना अशा प्रकारच्या खासगी सुविधेचा लाभ मिळत आहे. त्याच धर्तीवर शहरभर सेवा सुरू करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी केली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली होती. प्रकल्पासाठी तीन वर्षांत सुमारे 35 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
टँकर आरक्षणाची सुविधा सुरू करणे हा पहिला टप्पा आहे. दरांवर नियंत्रण, वेळेत पाणीपुरवठा आणि तक्रारींचे त्वरित निराकरण यांची प्रभावी व्यवस्था उभी राहिली, तरच पुणेकरांना खरा दिलासा मिळेल. पाण्याची टंचाई नागरिकांची परीक्षा पाहत असताना, टँकरसेवेतील मनमानीला आळा घालणेही महापालिकेसाठी तितकेच महत्त्वाचे आहे.







