छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Crime News) IAS अधिकारी असल्याची बतावणी करून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून वास्तव्य करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश झाला आहे. या महिलेचे नाव कल्पना त्र्यंबकराव भागवत असून, तिच्यासंदर्भात समोर आलेल्या माहितीमुळे तपास यंत्रणा हादरल्या आहेत. तिच्या घरात 19 कोटी रुपयांचा चेक आणि मोबाईलमध्ये पाकिस्तानी लष्कराचे नंबर मिळाल्याने, हे प्रकरण थेट राष्ट्रीय सुरक्षेशी सबंधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी या महिलेच्या पडेगाव येथील घराची झडती घेतली असता घरात 19 कोटी रुपयांचा चेक सापडला. त्यावर निखिल भाकरे आणि कल्पना भागवत यांची नावे असून, चेतन सुंदरजी भानुशाली यांचे नाव नमूद आहे. यासोबतच 6 लाख रुपयांचा दुसरा चेकही जप्त करण्यात आला आहे.
तपास यंत्रणांना संबंधित महिलेच्या मोबाईलमध्ये धक्कादायक पुरावे मिळाले आहेत. त्यात पाकिस्तान लष्कर आणि पेशावर आर्मीचे संपर्क क्रमांक आहेत. याशिवाय, अफगाण अॅम्बेसीचे नंबरही तिच्या फोनमध्ये आढळले. विशेष म्हणजे, तिच्या बँक खात्यामधून 32.68 लाख रुपयांचे मोठे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
कल्पना भागवत हिचे अफगाणिस्तानमधील नागरिक अशरफ याच्याशी प्रेमसंबंध होते. त्याचा भाऊ गालिब यमा हा पाकिस्तानी असून, ती व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात होती. “अपना डीलर पाकिस्तान में है, मालूम है ना?” यांसारखे संशयास्पद चॅटही तपास पथकांना सापडले आहेत. त्यामुळे ही महिला भारतात पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या महिलेच्या प्रवासाचा इतिहासही अत्यंत संशयास्पद आहे. दिल्लीत स्फोट घडण्याच्या आसपासच्या काळात तिने दिल्ली, मणिपूर, उदयपूर, आणि जोधपूर यांसारख्या संवेदनशील ठिकाणांवर वारंवार विमान प्रवास केला आहे. दरम्यान, महिलेला ताब्यात घेण्यात आले असून कसून चौकशी केली जात आहे.






