Crime News: डोंबिवली : लग्नाच्या दिवशी उत्साह आणि गडबडीची तयारी असते, पण डोंबिवलीत नुकताच अशी घटना समोर आली जिथे नवरदेवाला लग्नाच्या तयारीत असताना पोलिसांनी अटक केली. शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख या तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणात त्याच्यावर बलात्कार आणि पोक्सो (POSCO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

माहितीनुसार, पीडित तरुणी आणि अरमान यांची ओळख एका ऑनलाइन गेम अॅपवरून झाली होती. गेल्या तीन वर्षांपासून दोघांमध्ये मैत्री आणि प्रेमसंबंध होते. तरुणी 18 वर्षांची झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भिवंडीतील शांतीनगर परिसरात शुक्रवारी लग्नाची तयारी सुरू होती.
लग्न सोहळ्याची तयारी सुरू असतानाच एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतल्याने परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला आणि प्रकरण शांतीनगर पोलिसांच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि तरुणी डोंबिवलीतील असल्यामुळे तिला पुढील चौकशीसाठी विष्णूनगर पोलिस ठाण्यात पाठवले.
तिथे दिलेल्या तक्रारीत तरुणीने अरमानने तिला ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप केला. या तक्रारीच्या आधारे विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेखविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आणि घटनेचे सखोल पडताळणी सुरू आहे.







