समस्तीपूर: समस्तीपूरच्या शिवाजीनगर भागात 11 ऑगस्ट रोजी 19 वर्षीय (Crime News) गुडिया कुमारीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी शिक्षक कुमुद उर्फ दीपक तब्बल चार महिने फरार राहिल्यानंतर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. नालंदा जिल्ह्यातील नीमगंज गावचा 40 वर्षीय कुमुद पोलिस चौकशीत धक्कादायक कबुली देत म्हणाला की, त्याला आपल्या प्रेयसीशी लग्न करायचे होते, पण तिच्या कुटुंबाला, विशेषतः धाकटी बहीण गुडियाला तो मान्य नव्हता. गुडियामुळे आपले लग्न बिघडेल, या भीतीनेच तिला गोळ्या घालून ठार मारल्याचे आरोपीने सांगितले. हत्येनंतर तो आपल्या प्रेयसीलाही मारण्याच्या विचारात होता, मात्र पकडले जाण्याच्या भीतीने घटनास्थळावरून पळून गेला. (Breaking News)

कुमुद हा बहेरी येथील एका खासगी शाळेचा मुख्याध्यापक होता. गुन्ह्यानंतर तो प्रथम खगरिया येथे गेला आणि त्यानंतर गुवाहाटीला ट्रेनने पळून गेला. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने दाढी आणि केस कापून रूप बदलले. गुवाहाटीतील ज्योती नगर आरपीएफ कॉलनी रोडवर त्याने खोटी माहिती देऊन एक घर भाड्याने घेतले. मात्र घरमालकाने ओळखपत्राची मागणी केल्यावर आरोपी वारंवार टाळाटाळ करू लागला. त्याच्या वागणुकीवर संशय आल्याने घरमालकाने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आसाम पोलिसांसह समस्तीपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे 10 दिवसांच्या प्रयत्नांनंतर आरोपीला जेरबंद केले.
गुडिया ही उत्तर बारी वॉर्ड 1 येथील रहिवासी विनय कुमार यांची मुलगी होती. ती डी.एल.एड.ची तयारी करत होती आणि दरभंगा जिल्ह्यातील बहेरी येथे कोचिंगसाठी जात असताना तिच्यावर गोळीबार झाला. कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच गुडियाच्या मोठ्या बहिणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या कुमुदवर संशय व्यक्त केला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी एक काडतूस आणि चाकू जप्त केला होता. हत्येनंतर संतप्त नागरिकांनी कुमुद शिकवत असलेल्या शाळेला आग लावून रोष व्यक्त केला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीला समस्तीपूर येथे आणून तुरुंगात पाठवण्यात आले असून पुढील चौकशीसाठी त्याला रिमांडवर घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.






