Crime News: मुंबई: मुंबईतील फोर्ट (Fort) परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका फसवणुकीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून दोन अज्ञात व्यक्तींनी केनियातील एका महिला व्यापाऱ्याची मोठ्या रकमेची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी फोर्ट येथील एम.जी. रोडवरील अलाना सेंटर इमारतीसमोर ही घटना घडली. सुमाया मोहम्मद आब्दी वय 26 ही महिला केनियातील नैरोबी येथे राहणारी असून ती लहान मुलांच्या कपड्यांचा व्यवसाय करते. व्यवसायासाठी ती 26 जानेवारी रोजी भारतात आली होती आणि मोहम्मद अली रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होती.

सोमवारी सकाळी सुमाया कपड्यांची खरेदी करण्यासाठी मोहम्मद अली रोड आणि कालबादेवी परिसरात गेली होती. या दरम्यान तिने आपल्या चार सहकारी मैत्रिणींना आधी खरेदी केलेल्या मालाच्या मोबदल्यात 58 लाख रुपये रोख दिले होते. याशिवाय तिच्याकडे स्वतःचे 3 लाख 45 हजार रुपये होते. एकूण 66 लाख 45 हजार रुपयांची रोकड दोन वेगवेगळ्या बॅगमध्ये ठेवण्यात आली होती.

दुपारी सुमाया आणि तिची एक मैत्रीण टॅक्सीने कुलाब्यातील हॉटेलकडे निघाल्या असताना फोर्ट परिसरात एका दुचाकीस्वाराने टॅक्सी अडवली. दुचाकीवरील एका व्यक्तीने स्वतःला पोलिस असल्याचे सांगत तपासणी सुरू केली. टॅक्सी चालक खाली उतरताच दुसऱ्या आरोपीने मागील सीटवर बसलेल्या महिलांकडील बॅगची चौकशी केली. भीती आणि दबावामुळे महिलांनी रोकड असलेली बॅग आरोपींकडे दिली. पोलिस ठाण्यात घेऊन जातो असे सांगून आरोपी दुचाकीवरून पसार झाले.
घटनेनंतर घाबरलेल्या महिला थेट हॉटेलमध्ये पोहोचल्या. त्यानंतर टॅक्सी चालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.






