मुंबई: मुंबईतील दहिसर परिसरात एका (Crime News) दारूच्या व्यसनाधीन बापाने (Mumbai News) झोपलेल्या 14 वर्षांच्या मुलीवर ब्लेडने वार केल्याची आणि तिला वाचवायला आलेल्या पत्नीवरही हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपी हनुमंत सोनवळला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत सोनवळ हा दारूच्या नादात सतत पत्नी राजश्रीवर संशय घेत असे आणि तिच्यावर वेळोवेळी मारहाण करीत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून राजश्रीने वांद्रे कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केली होती. सोमवारी रात्री उशिरा ती वकिलांकडून माहिती घेऊन घरी परतली. त्यावेळी पतीने तिच्यावर आरोप करत जोरदार वाद केला आणि पत्नी व मुलगी दोघींनाही मारण्याची धमकी दिली.
वाद वाढल्यानंतर तो काही वेळ घराबाहेर गेला. मध्यरात्रीनंतर राजश्री आणि त्यांची मुलगी झोपल्यानंतर संशयित परत घरी आला. सव्वादोनच्या सुमारास झोपलेल्या मुलीला गळ्याजवळ वेदना झाल्या. तिने जागी होऊन पाहिले असता तिच्या गळ्यावर ब्लेडने वार झाल्याचे दिसले. तिच्या आरडाओरडीनंतर आई धावून आली, मात्र तिला वाचवण्याचा प्रयत्न करताच हनुमंतने तिच्या पोटावरही ब्लेडने वार केला.
या हल्ल्यांनंतर घाबरलेल्या दोघींनी शेजाऱ्यांना कळवले. नातेवाइकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देत दोघींना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने दोघींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दहिसर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून आरोपी हनुमंत सोनवळला अटक केली आहे. प्राथमिक तपासात त्याने दारूच्या नशेत आणि पत्नीवरील संशयातून हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असून कुटुंबातील सततचे भांडण, संशय आणि दारूच्या आहारी जाण्यामुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.







