अक्षय टेमगिरे
शिरूर : शिरूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर होणाऱ्या सततच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर धोकादायक ठिकाणी वाहतूक सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.

सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला प्रतिसाद देत नगरपरिषद व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी करून उपयोजना राबवणार असल्याचे सांगितले आहे. वाहतुकीची वाढती कोंडी आणि वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राबवण्यात येणाऱ्या सुरक्षाविषयक उपाययोजना :-
दुभाजक उभारणी : दोन–तीन दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू होऊन दीड महिन्यात काम पूर्ण होणार असुन
दिशादर्शक फलक : आठ–दहा दिवसांत तयार होऊन दुभाजकासोबत बसवले जातील.
सिग्नल दिवे : दुभाजक उभारणीच्या कामासोबतच लावले जाणार आहेत.
शास्त्रीय गतिरोधक : पावसाची उघडप मिळताच बसवले जातील.
झेब्रा क्रॉसिंग : तहसील व पंचायत समिती चौकात पावसानंतर करण्यात येणार आहे.
स्वच्छता व झाडांची छाटणी : दोन दिवसांत पूर्ण होणार असुन दुभाजक बसवेपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना सुरू राहतील.
या पाहणीवेळी नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता समाधान मुंगसे, कंत्राटी अभियंता सागर बडगुजर, ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष अरुणकुमार मोटे, सा.बां. विभागाचे गाडेकर, शिरूर पोलीस ठाण्याचे अमोल गारुडी आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते वाळुंज यांनी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांची भेट घेऊन कामांच्या प्रगतीबाबत चर्चा केली. तहसीलदारांनीही यापूर्वी नगरपरिषदेस आवश्यक सूचना दिल्याचे सांगून, पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना तातडीने कामे मार्गी लावण्यासाठी आदेश दिले आहेत.
“ही कामे वेळेत, दर्जेदार व शास्त्रीय पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. जनहितासाठी या कामांवर सातत्याने लक्ष ठेवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे,” अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते व व्हिसल ब्लोअर निलेश मंदा यशवंत वाळुंज यांनी मांडली आहे.
लवकरच शिरूर शहरातील वाहतूक सुरक्षेत लक्षणीय सुधारणा दिसून येणार असल्याचे ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष अरुण कुमार मोटे यांनी सांगितले आहे.







