पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेनंतर आता सर्वच रुग्णालयाला खडबडून जाग आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख व सर्वात मोठ्या ससून रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या रुग्णालयाच्या आवारात आता “पोलीस चौकी” उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रुग्णालयाच्या परिसरात २४ तास पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत.

ससून रुग्णालयाच्या आवारात ‘पोलीस चौकी’ तसेच तपासणीसाठी पिडीतांना आणल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासोबतच येथील सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.ससून रुग्णालयाच्या आवारात पोलीस चौकी उभारल्यानंतर आवारातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि तात्काळ कारवाई करणे शक्य होईल. शिवाय, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना तक्रार नोंदवण्यास रुग्णालयातून बाहेर पडण्याची गरज भासणार नाही. त्यापुढे त्यांना पोलिसांची तात्काळ मदत मिळू शकेल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. ससून रुग्णालय हे सर्वाधिक मोठे शासकीय रुग्णालय, प्रचंड रुग्ण संख्या असणारे व दररोज सर्वात जास्त रुग्णांची वर्दळ असणारे रुग्णालय आहे. त्यामुळे याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये गुन्हेगाराचे प्रमाण देखील वाढले आहे. रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने महिला आयोगाच्या बैठकीत ससून रुग्णालयाबाबत पुणे पोलिसांनी भूमिका मांडली. सोबतच येथे पोलीस चौकी सुरू करण्यासाठी तत्काळ निर्दोश दिल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसात आवारात पोलीस चौकी उभारून कामकाज सुरु केले जाणार आहे.







