लोणी काळभोर, ता.30 : नववीतील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात 26 फेब्रुवारी ते 29 मार्च 2024 यादरम्यान वेळोवेळी घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अवघ्या दोन तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे. तर लोणी काळभोर पोलिसांना पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळत आहे. चेतन मोरे (रा. लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 14 वर्षाच्या निर्भयाच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून त्या लोणी काळभोर परिसरात कुटुंबासोबत राहतात. फिर्यादी व त्यांचे पती दोघेजण लागेल ते काम करून कुटुंबाचा गाडा हाकतात. फिर्यादी यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी ही 14 वर्षाची असून ती लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत शिक्षण घेत आहे.

चेतन व निर्भया यांची एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली. त्यानंतर त्याने निर्भयाला एका कॅफेमध्ये भेटण्यासाठी बोलाविले. ती भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याने तिचा उजवा हात पकडला व “तु मला आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे.” असे म्हणाला तसेच “तु जर माझेसोबत लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेल” अशी धमकी दिली. त्यावेळी ती म्हणाली, मी अजून लहान आहे. मला लग्न करायचे नाही असे म्हणुन कॅफे मधून बाहेर येवुन घरी निघून गेली.

त्यानंतर ती घरी जात असताना, चेतनने तिचा मोटार सायकलवरुन पाठलाग केला. तसेच पिडीत मुलगी ही तीच्या आजोबांच्या राहत्या घरी असताना, चेतन तिला म्हणाला, मला तु भेट, मला तुझ्याशी बोलायचे आहे. त्यावेळी पिडीतेच्या आजोबांनी त्याला निघुन जाण्यास सांगितले. तेव्हा त्याने तुम्हाला बघुन घेईल? अशी धमकी देवून निघुन गेला.
याप्रकरणी पिडीतेच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चेतन मोरे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 74,78, 351 (2) (3) सह पोक्सो कायदा कलम 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अवघ्या दोन तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करीत आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी पुण्याचे पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव, पोलीस हवालदार विलास शिंदे, सुनील नागलोत, पोलीस अंमलदार बाजीराव वीर, शैलेश कुदळे व त्यांच्या पथकाने केली आहे.







