Bhigwan News : भिगवण, (पुणे) : आगामी राष्ट्रीय जनगणना २०२७ च्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सक्तीच्या शासकीय कामाकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका जिल्हा परिषद शिक्षकावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय आदेश धुडकावून लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल झाल्याने महसूल आणि शिक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. Bhigwan News :

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे पोंधवडी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक किशोर हनुमंत खाडे यांची आगामी राष्ट्रीय जनगणना २०२७ च्या कामासाठी ‘प्रगणक’ म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना मदनवाडी गावच्या हद्दीतील जनगणनेचे काम सोपवण्यात आले होते. मात्र, दिनांक १६ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत शिक्षक किशोर खाडे हे जनगणनेच्या कामावर जाणीवपूर्वक गैरहजर राहिले आणि त्यांनी हे महत्त्वपूर्ण शासकीय काम करण्यास स्पष्ट नकार दिला. Bhigwan News :

शिक्षक खाडे हे कामावर हजर होत नसल्याचे पाहून ग्राममहसूल अधिकारी तथा जनगणना सुपरवायझर बजरंग केशव सोनवले यांनी त्यांना वारंवार फोनवरून सूचना दिल्या. इतकेच नव्हे तर, जनगणनेच्या कामावर तत्परतेने रुजू होण्याबाबतचे लेखी आदेश आणि शासकीय सूचना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर संदेशाद्वारे देखील पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, या सर्व सूचनांना केराची टोपली दाखवत खाडे यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नाही. Bhigwan News :
शासकीय कामात अडथळा आणि आदेशाची पायमल्ली होत असल्याचे पाहून अखेर जनगणना सुपरवायझर बजरंग सोनवले यांनी थेट भिगवण पोलीस ठाणे गाठून या शिक्षकाविरोधात अधिकृत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी शिक्षक किशोर हनुमंत खाडे याच्याविरुद्ध जनगणना अधिनियम १९४८ चे कलम ११(१)(२) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३ अ (शासकीय आदेशाचे उल्लंघन करणे) नुसार कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश उगले हे अत्यंत गांभीर्याने करत आहेत. Bhigwan News :







