पुणे : पुणे महामेट्रोच्या रस्त्यांवरील दुभाजकांचे सुशोभीकरणाचे काम पहिल्या टप्प्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय या अंतरातील लवकरच होणार आहे. आणि हे काम एका कंपनीला कार्य करण्याचे आदेश महामेट्रोकडून देण्यात आले आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या उन्नत मार्गिकांची कामे जवळपास झाल्याने मेट्रो मार्गिकालगत असलेल्या रस्त्यांवरील दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. सुशोभीकरणाचा आर्थिक ताण प्रशासनावर पडू नये, यासाठी खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. सुशोभीकरणाचे काम केल्यानंतर कंपनीला सुशोभीकरण केलेल्या जागेत दोन जाहिरात फलक लावण्याची मुभा देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय या अंतरातील रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण होणार असून एका कंपनीला काम करण्याचे कार्य आदेश महामेट्रोकडून देण्यात आले आहेत. या माध्यमातून तिकिटाव्यतिरिक्त उत्पन्न महामेट्रोला मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, मेट्रोच्या दोन खांबांमधील अंतर साधारणपणे २५ ते ३० मीटर असून त्याची रूंदी २ ते २.२५ मीटर एवढी आहे. महापालिकेने जागोजागी रस्त्यांच्या दुभाजकांचे सुशोभीकरण केले आहे. त्याच पद्धतीने रस्ते दुभाजकांचे सुशोभीकरण नियोजित आहे. सुशोभीकरणाच्या कामाचा आर्थिक ताण मेट्रो प्रशासनावर पडू नये, यासाठी महामेट्रोकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.
शहराच्या महत्त्वाच्या चौकांमधील मेट्रो खांबांवर व्हर्टिकल गार्डनही विकसित करण्यात येणार आहे. दुभाजकांमधील झाडे आणि व्हर्टिकल गार्डनच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाच वर्षांपर्यंत कंपनीकडे राहणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते हॅरिस पूल आणि शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते रामवाडी या टप्प्यातील निविदा प्रक्रियाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.