बारामती: बारामती शहरात भिगवण (Baramati News) रोडवरील वृंदावन हॉटेल बाहेर पार्किंगच्या किरकोळ कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. काठ्या, दगड आणि लोखंडी गज वापरून झालेल्या हल्ल्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना 29 नोव्हेंबरच्या सकाळी घडली. (Breaking News)

मानस पाटील हे त्यांच्या मित्रांसह जेवणासाठी वृंदावन हॉटेलमध्ये आले होते. पार्किंगच्या कारणावरून त्यांचा काही अनोळखी तरुणांशी वाद झाला. वाद वाढण्याआधी आरोपी हॉटेलमध्ये जेवायला बसले, पण त्यांनी बाहेरून 8 ते 10 साथीदारांना बोलावले. जेवण संपवून मानस पाटील आणि त्यांचे मित्र बाहेर येताच आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. काठ्या, दगड आणि लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. दगडफेकीत त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. फिर्यादी मानस पाटील यांच्या डोक्यात दगड आणि गजाने घातक वार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली. त्यानुसार राम अनिल लोखंडे या तरुणाला अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक युवराज पाटील करत आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांना कठोर इशारा दिला आहे. परिसरात दहशत माजवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही आणि अशा प्रकारच्या घटनांची माहिती तात्काळ पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले.







