पुणे : येत्या ऑक्टोबर 2026 या महिन्यात सण आणि उत्सवांची मोठी रेलचेल आहे. त्यामुळे तुम्ही जर बँकेत जाऊन एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल, तर ऑक्टोबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी आधीच तपासून घेणे फायद्याचे ठरेल.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, विविध सण, राष्ट्रीय उत्सव आणि शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे या महिन्यात अनेक दिवस बँकांचे कामकाज बंद असणार आहे.

देशभरात 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्व बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल. याशिवाय दर महिन्याप्रमाणे 10 ऑक्टोबरला दुसरा शनिवार आणि 24 ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने बँक व्यवहार बंद राहतील. तसेच 5, 11, 18 आणि 25 ऑक्टोबर रोजी रविवारी नियमित सुट्टी असेल. या व्यतिरिक्त दसरा, दुर्गापूजा, विजयादशमी आणि लक्ष्मीपूजा यांसारख्या विविध प्रादेशिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये अतिरिक्त सुट्ट्या लागू होतील.

आरबीआयच्या यादीनुसार, ऑक्टोबरमध्ये त्रिपुरा राज्यात सर्वाधिक 12 दिवस बँका बंद राहतील. तेथे सणांच्या निमित्ताने 2, 17, 19, 20, 21 आणि 26 ऑक्टोबर या दिवशी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या सहा दिवसांसोबत चार रविवार आणि दोन शनिवार मिळून एकूण 12 दिवस कामकाज होणार नाही. याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये सुमारे 11 दिवस, तर गंगटोक (सिक्कीम) मध्ये जवळपास 10 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.

जरी बँकेच्या शाखा प्रत्यक्ष कामासाठी बंद असल्या, तरी ग्राहकांना आर्थिक व्यवहारात मोठी अडचण येणार नाही. युपीआय, एटीएम,नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवा 24 तास सुरू राहतील. परंतु, चेक क्लिअरन्स किंवा प्रत्यक्ष शाखेत जाऊन करायच्या कामांसाठी सुट्ट्यांचे नियोजन करूनच बाहेर पडणे योग्य ठरेल.






