Ajit Pawar : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आज संपत असल्याने सगळ्या नेत्यांनी शेवटची जोराची धडपड सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तिघेही पुणे परिसरात शेवटचा हात फिरवत आहेत. त्यातच राजगुरुनगरमध्ये अजित पवार यांची मोठी सभा झाली आणि तिथं त्यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या मिश्किल शैलीनं सगळ्यांना हसवलं.

सभेत भाषण करताना ते म्हणाले, “बाबा लोकांचं ऐकावंच लागतं… कोणते बाबा, ते तुम्हीच ठरवा!” एवढं म्हणताच सभेत हशा पिकला. त्याचवेळी मंचावर बाबा राक्षे त्यांना काही मुद्दे कागदावर देत होते. ते पाहताच अजितदादा म्हणाले, “अरे आता मला शिकवायला लागलेत! काय असं बोला, तसं बोला… माझं टक्कल पडलं तरी हे मलाच शिकवतात काय बोलावं!” त्यांच्या या टोमण्यानं सगळ्यांच्याच चेहऱ्यावर स्मित आलं.
यानंतर अजित पवारांनी त्यांच्या विरोधकांनाही चांगलाच चिमटा काढला. “मी कामाचा माणूस आहे, प्रशासनावर माझी पकड आहे. पण काही लोक काय काय आरोप करतात… 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला म्हणे! मी एक रुपयाचा मिंदा नाही. कोणाकडून पैसे घेतलेत ते दाखवून तरी बघा. उलट प्रशासनच मला टरकून राहतं,” असं ठामपणे सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावले.
सभेच्या अखेरीस त्यांनी पुन्हा एकदा आपला खास अंदाज दाखवत, लोकांना निवडणुकीत काम करणाऱ्यांनाच साथ द्या असा संदेश दिला.







