Accident : धाराशिव (सोलापूर) – मंगळवारी दुपारी सोलापूर-हैदराबाद महामार्गावर एक भयानक अपघात घडला. लग्नात जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या चहा स्टॉलमध्ये धडक दिली. या अपघातात चहा स्टॉलमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील तुळजापूर तालुक्यातील तुळजाभवानी देवीचे दर्शन करून परत जात असलेल्या कारचा क्रमांक TS 34 F 4706 होता. कार उमरगा चौरस्त्याजवळील भारत टायरजवळून जाताना अचानक टायर फुटल्यामुळे वाहन चालकाचा ताबा सुटला आणि महामार्गाच्या बाजूला असलेल्या चहा स्टॉलमध्ये कार शिरली. धडक इतकी जोराची होती की स्टॉलसमोर उभी असलेली दुचाकी चक्काचूर झाली.

या भीषण अपघातात उमरग्याचे माजी नगरसेवक बळी पवार आणि जणता अर्थ मुव्हर्सचे मालक लाडनशहा मुर्शद यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्टॉलवरील मेकॅनिक सचिन कुठार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेत जखमी व्यक्तींना रुग्णालयात पोहोचवले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहचून अपघाताची नोंद घेत तपास सुरु केला आहे. अपघातामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी रस्ता सुरक्षिततेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.







