पुणे : दिल्लीतील जंतरमंतरवर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या नियोजित आंदोलनापूर्वीच पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर 24 तासांच्या आत न्यायाधीशांच्या आदेशानुसार सीजेपीचे नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका करण्यात आली आहे. सुटकेनंतर या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.

सुटका झाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी एक पोस्ट लिहिली आहे. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, देशाचे नेतृत्व करणारे व्यक्ती इतके भित्रा आणि अरेरावी करणारे कधीच पाहिले नव्हते. मोदी हे भारतासाठी मानहानीची गोष्ट बनले आहेत, असे ते म्हणाले. याशिवाय, त्यांच्या आजी सावित्रीबाई दिपके यांचे निधन झाल्याची दुःखद बातमीही त्यांनी दिली. कुटुंबातील या कठीण प्रसंगात स्वतः उपस्थित राहता न आल्यामुळे ते आता आपल्या गावी परतत आहेत. मात्र, सौरव आणि आशुतोष लवकरच दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती त्यांनी दिली.

आमचा पक्ष कोणाच्याही दबावामुळे मागे हटणार नाही किंवा घाबरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 10 ऑक्टोबरची ही घटना हुकूमशाहीच्या अंताची सुरुवात म्हणून इतिहासात ओळखली जाईल, असेही दिपके यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या बाजूला, सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांनीही आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेवरून हटवण्यासाठी आपण आयुष्यभर तुरुंगवास भोगण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील शांतता आणि सलोखा नष्ट करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले आहे, असा आरोपही रांका यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, विरोधकांकडून सरकारवर कठोर टीका केली जात आहे.






