पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील मुलांमध्ये वैज्ञानिक आवड वाढवण्यासाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेल्या खडतर परीक्षांमधून हवेली तालुक्यातील तब्बल 10 बालवैज्ञानिकांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांची जगातील नामांकित अंतराळ संस्थांना भेट देण्यासाठी निवड झाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी

नासा (अमेरिका) भेट:

कार्तिक सुधाकर वाळके (लोणीकंद)
पार्थ विक्रम ताजणे (पेरणे)
इस्रो (भारत) भेट:
ओम स्वप्नील यादव (लोणीकंद)
अनन्या सुनील देशमुख (लोणीकंद)
राधिका अतुल बोबडे (लोणीकंद)
सुहानी विलास चव्हाण (लोणीकंद)
अथर्व रामदास कंद (लोणीकंद)
विश्वेशा विशाल ओहाळ (गाऊडदरा)
युरोपियन स्पेस एजन्सी भेट:
श्रावणी बाळू आंबेकर (लोणीकंद)
सिद्धी सुभाष इंगळे (लोणीकंद)
अशी पार पडली निवड प्रक्रिया
इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी तीन टप्प्यांत घेतली गेली:
पहिला टप्पा: संपूर्ण जिल्ह्यातून 23,662 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
दुसरा टप्पा: पहिल्या परीक्षेतून 1,664 मुलांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली.
अंतिम टप्पा: ‘आयुका’ (IUCAA) संस्थेने घेतलेल्या अंतिम परीक्षेतून संपूर्ण जिल्ह्यातून 103 तर हवेलीतील 10 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विज्ञान संस्थांना भेट देऊन संशोधन प्रत्यक्ष पाहण्याची ही सुवर्णसंधी मिळाली आहे. या अभूतपूर्व यशामुळे हवेली परिसरात, पालकांमध्ये आणि शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, तसेच येत्या वर्षात अधिक मुलांनी या स्पर्धेत यश मिळवावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







