पुणे: बाजारात सध्या हापूस, पायरी आणि केशर आंब्याची मोठी आवक सुरू झाली आहे. मात्र, अधिक नफा कमावण्यासाठी अनेक विक्रेते कच्च्या आंब्यांवर ‘कॅल्शियम कार्बाईड’ किंवा इतर धोकादायक रसायनांचा वापर करून ते पिकवत आहेत. असा आंबा खाल्ल्याने पोटाचे विकार, विषबाधा आणि दीर्घकाळात कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. अशा स्थितीत नैसर्गिकरीत्या पिकलेला आंबा कसा ओळखावा? जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स.
रंगावरून करा ओळख

- नैसर्गिक: नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याचा रंग पूर्णपणे एकसारखा नसतो. त्यात काही ठिकाणी हिरवट छटा किंवा पिवळसर रंगाचे विविध छटा दिसतात.
- केमिकल: रसायनांनी पिकवलेला आंबा दिसायला अतिशय आकर्षक आणि पूर्णपणे गडद पिवळा किंवा केशरी दिसतो. त्यावर कुठेही हिरवा डाग नसतो.
वासावरून ओळखा
- नैसर्गिक: आंबा नाकाजवळ धरल्यास त्याचा एक गोड आणि विशिष्ट नैसर्गिक सुगंध येतो. आंब्याचा देठ असलेल्या भागातून हा सुगंध अधिक तीव्र येतो.
- केमिकल: रसायनांनी पिकवलेल्या आंब्याला कोणताही नैसर्गिक सुगंध नसतो. उलट अशा आंब्याला अनेकदा औषधाचा किंवा रॉकेलसारखा रासायनिक वास येतो.
पाण्याचा प्रयोग
ही सर्वात खात्रीशीर पद्धत आहे. एक बादली पाणी घ्या आणि त्यात आंबे टाका.
- नैसर्गिक: जर आंबा बादलीच्या तळाशी जाऊन बसला, तर समजा तो झाडावर किंवा नैसर्गिकरीत्या पिकलेला आहे.
- केमिकल: जर आंबा पाण्यावर तरंगत राहिला, तर समजा तो रसायनांच्या साह्याने (कार्बाईड) पिकवलेला आहे.
चवीत जाणवतो फरक
- नैसर्गिक: नैसर्गिकरीत्या पिकलेला आंबा कापल्यावर आतून पूर्णपणे केशरी किंवा पिवळा दिसतो आणि तो खाताना रसाळ लागतो.
- केमिकल: बाहेरून पिवळा दिसणारा आंबा आतून पांढरट किंवा फिकट असू शकतो. असा आंबा खाताना जीभेला थोडीशी आग किंवा जळजळ जाणवू शकते.
साल तपासा
नैसर्गिक आंबा हाताला मऊ आणि लवचिक लागतो. याउलट, रासायनिक आंबे काही ठिकाणी कडक तर काही ठिकाणी जास्तच मऊ लागतात. त्यांच्या सालीवर काळे ठिपके (केमिकल बर्न) असण्याची शक्यता जास्त असते.
बाजारातून आंबा आणल्यानंतर तो किमान अर्धा ते एक तास कोमट पाण्यात भिजवून ठेवावा. यामुळे सालीवरील रसायनांचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. तसेच, देठाच्या बाजूचा भाग थोडा कापून मगच आंबा खावा. स्वस्त मिळतोय म्हणून रस्त्यावरील कोणत्याही आंब्याची खरेदी करू नका. विश्वसनीय विक्रेत्यांकडूनच फळे खरेदी करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपा.







