पुणे: सध्याच्या धकाधकीच्या (Ruptured Eardrum) जीवनात आणि प्रदूषणाच्या विळख्यात आपण शरीराच्या अनेक नाजूक अवयवांकडे दुर्लक्ष करतो, त्यापैकीच एक म्हणजे ‘कान’. कानाचा पडदा फाटणे ही समस्या सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. केवळ काडीने कान कोरणेच नाही, तर हेडफोनचा अतिवापर आणि संसर्ग ही देखील यामागची मोठी कारणे ठरत आहेत.

कानाचा पडदा नेमका का फाटतो?
कानाचा पडदा हा अत्यंत नाजूक आणि पातळ पापुद्रा असतो. तो फाटण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
-
संसर्ग (Infection): कानात पाणी जाऊन किंवा सर्दीमुळे मध्यकर्णात पू साचल्यास पडद्यावर दाब येतो आणि तो फाटतो.
-
आघात (Injury): कानात पिना, काड्या सारख्या वस्तू घातल्याने थेट पडद्याला इजा होते.
-
मोठा आवाज: फटाके किंवा मोठ्या आवाजाच्या स्फोटामुळे पडदा फाटू शकतो.
-
विमानाचा प्रवास किंवा डायव्हिंग: हवेच्या दाबातील तीव्र बदलामुळे पडद्याला छिद्र पडू शकते.
लक्षणे कशी ओळखावीत?
जर तुम्हाला खालीलपैकी काही जाणवत असेल, तर सावध व्हा:
१. कानात अचानक तीव्र वेदना होणे.
२. कानातून पाणी, रक्त किंवा पू येणे.
३. कानात सतत ‘शिट्टी’ वाजल्यासारखा आवाज येणे.
४. ऐकू कमी येणे किंवा चक्कर येणे.
पडदा फाटल्यास काय करावे?
जर तुम्हाला शंका असेल की पडदा फाटला आहे, तर सर्वात आधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
-
पाण्यापासून बचाव: कानात अजिबात पाणी जाऊ देऊ नका. अंघोळ करताना कानात कापसाचा गोळा तेलात बुडवून लावावा, जेणेकरून पाणी आत जाणार नाही.
-
स्वतः उपचार टाळा: कानात कोणतेही तेल, घरगुती औषध किंवा ड्रॉप्स स्वतःहून टाकू नका. यामुळे संसर्ग वाढून परिस्थिती गंभीर होऊ शकते.
-
सर्दीपासून सावध राहा: जोरात नाक शिंकरणे टाळा, कारण यामुळे कानावर दाब येऊ शकतो.
उपचार काय आहेत?
बहुतेक वेळा पडद्याला पडलेले छोटे छिद्र योग्य औषधोपचार आणि काळजी घेतल्यास 4 ते 8 आठवड्यांत नैसर्गिकरित्या भरून येते. मात्र, जर छिद्र मोठे असेल किंवा औषधांनी भरून येत नसेल, तर डॉक्टर ‘मायरिंगोप्लास्टी’ नावाची छोटी शस्त्रक्रिया सुचवतात. ही शस्त्रक्रिया आता अत्यंत प्रगत पद्धतीने आणि दुर्बिणीतून केली जाते, ज्यामध्ये टाकेही पडत नाहीत.







