
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाकडून डेंग्यू, चिकनगुनिया आणि इतर डासजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी कंटेनर सर्वेक्षण मोहीमेचा जोर वाढवण्यात आला आहे. आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थळांची तपासणी करण्यात येत आहे आणि त्यांचे त्वरित निर्मूलन केले जात आहे.

आरोग्य विभागाचे कर्मचारी घराघरांत जाऊन पाण्याचे साठे, टाक्या, कुंड्या, फुलदाण्या, कूलर, टायर यासारख्या ठिकाणी अळ्यांची तपासणी करत आहेत. ज्या ठिकाणी अळ्या आढळतात, तेथे संबंधित नागरिकांना नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली जात आहे. अळ्यांचे निर्मूलन करण्यासाठी टेमिफॉससारख्या अळीनाशकांचा वापर केला जात असून काही भागांमध्ये गप्पी मासेसुद्धा सोडले जात आहेत.

यासंदर्भात नागरिकांनाही काही सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना परिसरात स्वच्छता राखून कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. टाक्या, ड्रम्स, कुंड्या यांसारख्या पाण्याच्या साठ्यांना झाकण घालून ठेवायचे आहे. घर व परिसरातील पाण्याचे साठे नियमितपणे तपासून ते स्वच्छ राहण्याची दक्षता आणि काळजी घ्यायची आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे लागणार आहे.
डासांच्या उत्पत्तीबाबत माहिती आढळल्यास नागरिकांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजला नागरिकांनी भेट द्यावी. जनजागृती आणि कारवाईसाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.







