पुणे: केंद्र सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने देशभरात १६ फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर तातडीने बंदी घातली आहे. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940 च्या कलम 26A नुसार आरोग्य मंत्रालयाने या निर्णयाची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. वैज्ञानिक चाचण्या आणि सखोल तपासणीनंतर ही औषधे वैद्यकीयदृष्ट्या निरुपयोगी असल्याचे सिद्ध झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या प्रकारच्या औषधांवर बंदी?

या बंदीमुळे बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक औषधांच्या मिश्रणावर गदा आली आहे. यामध्ये प्रामुख्याने काही अँटिबायोटिक्स, वेदनाशामक गोळ्या, पोटदुखीवर वापरली जाणारी औषधे आणि त्वचारोगांवर वापरल्या जाणाऱ्या काही क्रीम्सचा समावेश आहे. उदाहरणार्थ, अमोक्सिसिलिन आणि सेराटिओपेप्टिडेज सारखी लोकप्रिय औषधी संयुगे आता बंद करण्यात आली आहेत. तसेच, कोरफड अर्कासोबत व्हिटॅमिन ई, जोजोबा ऑइल, टी-ट्री ऑइल आणि इतर घटक असलेल्या काही स्किनकेअर उत्पादनांच्या वापरावरही सरकारने बंदी घातली आहे.
अँटिबायोटिक संयुगे (Antibiotic Combinations)
-
Amoxicillin + Serratiopeptidase + Lactobacillus Sporogenes
-
Amoxicillin + Cloxacillin + Lactic Acid Bacillus + Serratiopeptidase
-
Amoxicillin + Serratiopeptidase
-
Cefadroxyl + Probenecid
-
Cefuroxime + Serratiopeptidase
वेदनाशामक आणि पोटदुखीवरील औषधे (Painkillers & Antispasmodics)
-
Dicyclomine + Paracetamol + Clidinium Bromide
-
Dicyclomine + Paracetamol + Clidinium Bromide + Chlordiazepoxide
-
Acetyl Salicylic Acid + Ethoheptazine
-
Gliclazide + Chromium Picolinate
-
Paracetamol + Lignocaine
बंदी का घातली?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ‘ड्रग्ज टेक्निकल ॲडव्हायजरी बोर्ड’ (DTAB) कडून बाजारातील औषधांचे व्यापक पुनरावलोकन करण्यात आले होते. या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार, या 16 औषधांना कोणताही पुरेसा वैज्ञानिक आधार नसल्याचे समोर आले. ही औषधे रुग्णांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात किंवा उपचारांच्या दृष्टीने निष्फळ आहेत. रुग्णांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि डॉक्टरांकडून योग्य औषधोपचारांना प्रोत्साहन देणे हा या बंदीमागील मुख्य उद्देश आहे.
आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. औषध उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांना तातडीने ही औषधे बाजारातून हटवण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णांनी कोणतीही औषधे घेण्यापूर्वी ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत आणि बंदी असलेल्या यादीतील औषधे वापरू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.







