पुणे: प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकने आता थेट ‘व्लॉगिंग’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. “आम्ही, मलिक कुटुंब आता व्लॉगिंग करणे थांबवत आहोत.” या निर्णयामागे अरमानने स्पष्टीकरण देताना म्हटले की, “आम्हाला आमच्या मुलांच्या संगोपनाकडे आणि त्यांच्या वाढीकडे अधिक लक्ष द्यायचे आहे. व्लॉगिंगमध्ये सतत वेळ खर्च होत असल्यामुळे मुलांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नव्हते.” नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या मलिक कुटुंबाने व्लॉगिंग बंद करण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

मुलांच्या संगोपनासाठी घेतला मोठा निर्णय
“मी, पायल आणि कृतिकाने व्लॉगिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. पायलनेही अरमानच्या या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. आता आम्ही फक्त एकच चॅनेल सुरू ठेवू, ते म्हणजे ‘मलिक किड्स’ हे आहे. त्यावर आम्ही मुलांचे व्हिडिओ टाकत राहू. मुलांची शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संगोपनाकडे आम्ही अधिक लक्ष देणार आहोत.” असे अरमानने स्पष्ट केले आहे.
अरमानने चाहत्यांना सांगितले आहे की, त्यांची मुले कशी आहेत, याबद्दलचे अपडेट्स ते नवीन व्लॉगमध्ये देत राहतील. अरमानला दोन पत्नी असून, कृतिका आणि पायल मलिक अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांची स्वतःची वेगवेगळी युट्यूब पेजेस आहेत. त्यावर ते दररोज नवीन व्हिडिओ टाकतात, ज्यांना लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळतात.







