इंदापूर (संतोष पवार )
Scholarship Exam : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २६ एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात येणार आहे. यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा ही चौथी आणि सातवी इयत्तेसाठीच घेतली जात होती परंतु शिक्षण हक्क कायद्यातील (RTE ) तरतुदीनुसार २०१६ – १७ पासून ही परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी लागू करण्यात आली . परंतु दरवर्षी या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत चालल्याचे निदर्शनास आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर पुन्हा पूर्वीप्रमाणेच अर्थात इयत्ता चौथी व सातवीच्या वर्गाना शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला . त्यानुसार इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ तर चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल २०२६ ला घेतली जाणार आहे .चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल रोजी होणार असून सकाळी 11 ते 12 या वेळेत प्रथम भाषा व गणित या विषयाची परीक्षा होईल. (Scholarship Exam)
तर दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची परीक्षा घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थी नियमित शुल्कासह येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरू शकतील. विलंब शुल्कसह अर्ज भरण्याची मुदत 3 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी आहे. तर अति विलंब शुल्कासह 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज भरता येईल. त्याचप्रमाणे अतिविशेष विलंब शुल्कासह अर्ज भरण्याचा कालावधी 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी आहे. 28 फेब्रुवारी नंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार नाही.







