यवत : गणेशोत्सव 2026 चा सण शांततेत आणि सुरळीत पार पडावा, तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी यवत पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली आहे. यवत पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील तब्बल 34 सराईत आरोपींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित आरोपींवर यापूर्वी विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यांच्या हालचालींमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला तसेच सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार हद्दपारीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासाठी यवत पोलिसांनी अभिलेखावरील सराईत आरोपींविरोधात बीएनएसएस कलम 163(2) अन्वये विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. प्रस्तावांची चौकशी करून मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक शांततेला प्राधान्य देत ही कारवाई करण्यात आली आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरी, अवैध धंदे किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, पोलीस उप-निरीक्षक मारोती मेतलवाड, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग बनकर, यवत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदिप देवकर, महेंद्र चांदणे, रॉकी देवकाते, नवनाथ शेंडगे, अमोल भुजबळ, प्रतिक जगताप, मारूती बाराते, सचिन गुंड, धिरज जाधव, दिनेश लोणकर, विनित कुन्हाडे यांचे पथकाने केली आहे.






