पुणे : पुण्यातील खराडी भागात एका 24 वर्षीय महिला कॉम्प्युटर इंजिनियरने राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळची बिहार येथील असणारी जान्हवी पाठक (वय २३) ही तरुण महिला इंजिनियर गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यातील खराडी येथील ‘रिव्हर डेल’ सोसायटीत राहत होती. ती एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होती. तिने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणाची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. जान्हवीच्या काकांनी दिलेल्या तक्रारीवरून उत्तर प्रदेशातून आलेल्या तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जान्हवी आणि संशयित आरोपी अमृतकुमार सिंह यांची शालेय जीवनापासून ओळख होती. राजस्थानमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर जान्हवी नोकरीसाठी पुण्यात आली, तर अमृतकुमार नोएडामधील एका आयटी कंपनीत काम करत होता.पुण्यात आल्यानंतर दोघांमध्ये अंतर वाढल्यामुळे गैरसमज निर्माण झाले होते. यातूनच त्यांच्यात सातत्याने वाद होत असत.
गुरुवारी रात्री नोएडाहून आलेला अमृतकुमार आणि जान्हवी यांच्यात तीव्र भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. शुक्रवारी दुपारी 12.30 ते 1.30 च्या सुमारास अमृतकुमार घराखाली गेला असताना जान्हवीने टोकाचे पाऊल उचलले.
नात्यातील मानसिक त्रास आणि वादाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.






