मुंबई : मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवेत असलेले राधाकिसन तुकाराम वारघडे यांची नाशिकमधील गरुडेश्वर येथे मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या सुट्टीनिमित्त वारघडे नाशिकला गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास राधाकिसन वारघडे हे वंदना कुंदे नामक महिलेशी संवाद साधत होते. हे पाहून वंदना यांच्या मुलांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी वारघडे यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यादरम्यान त्यांच्या डोक्यात टणक वस्तूने गंभीर वार करण्यात आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मृत वारघडे यांचे पुतणे कुणाल वारघडे यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. आपल्या काकांना मध्यरात्री गाठून बेदम मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. किरण कुंदे आणि दीपक कुंदे यांनी हा प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

प्रेमसंबंधाच्या संशयातून किंवा वादातूनच हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याच दृष्टिकोनातून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.







