Pune illegal abortion racket : यवत, (पुणे) : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केडगाव येथे उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची कडक व्याप्ती वाढवली आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी शुक्रवारी (ता. 26) धडक कारवाई करत आणखी दोन प्रमुख आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यातील बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात आणि एजंट वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

डॉ. सुमंत तुकाराम शितोळे (वय-38, व्यवसाय-डॉक्टर, मंगलमूर्ती हॉस्पिटल, रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे) आणि बापूराव पंढरीनाथ जांबले (वय 57, रा. वासुंदे, ता. दौंड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचा मुख्य सुत्रधार अण्णासाहेब आप्पा गिरी याच्याकडे ज्या गरोदर महिलांची बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी केली जात असे, त्या महिलांना डॉ. सुमंत शितोळे हा आपल्या पारगाव येथील ‘मंगलमूर्ती हॉस्पिटल’मध्ये आणत होता. तिथे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता पैशांच्या हव्यासापोटी या निष्पाप स्त्री-भ्रूणांचा बेकायदेशीरपणे गर्भपात केला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या रॅकेटमधील दुसरा अटक केलेला आरोपी बापूराव जांबले हा या संपूर्ण रॅकेटमध्ये मुख्य एजंट म्हणून कडक सक्रिय होता. बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठी लागणारी अत्यंत संवेदनशील, जीवघेणी आणि शासनाने प्रतिबंधित केलेली औषधे व कडक इंजेक्शन मुख्य आरोपींना ‘गायकवाड हॉस्पिटल’ येथे आणून पुरवण्याचे कृत्य हा आरोपी करत होता. या दोन्ही आरोपींना शनिवारी (ता. 27) दौंड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या रॅकेटचे कडक मूळ शोधण्यासाठी दोघांनाही दिनांक 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची धडाकेबाज कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कडक मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तथा एसआयटीचे मुख्य तपास अधिकारी संतोष तासगावकर यांसह विशेष तपास पथकातील (SIT) व इतर नियुक्त कडक अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने केली आहे.
याबाबत बोलताना यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा मुख्य तपास अधिकारी, संतोष तासगावकर म्हणाले, ” SIT “स्त्री-भ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदान हा आपल्या सामाजिक स्वास्थ्याला मोठा कलंक व घातक ठरणारा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. या रॅकेटमध्ये पडद्यामागून किंवा थेट सहभागी असलेल्या, मदत करणाऱ्या किंवा वैद्यकीय व्यवसायाचा गैरवापर करणाऱ्या इतर कोणत्याही डॉक्टर, एजंट किंवा मध्यस्थांची कडक शब्दात गय केली जाणार नाही! सामाजिक स्वास्थ्याला बाधक असणाऱ्या अशा सर्व दोषी आरोपींचा शोध घेऊन त्यांना कायद्यानुसार कठोर शासन होईपर्यंत पोलीस प्रशासनाचे हे कडक अटक सत्र सुरूच राहील!”






