Pimpri Crime पुणे, ता. १० : पिंपरी-चिंचवडमधील एका उच्चभ्रू सोसायटीत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका वॉचमननेच चार अल्पवयीन मुलींना आमिष दाखवत त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, एका १० वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली. Pimpri Crime

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपी दिनेश चौधरी याने १०, ८, ६ आणि ८ वर्षांच्या चार मुलींना “पाण्याची टाकी दाखवतो” असे सांगून इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेले. तेथे त्याने मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती. Pimpri Crime

धमकीमुळे मुली घाबरून गेल्या होत्या. मात्र, त्यातील एका १० वर्षांच्या मुलीने धाडस दाखवत घरी पोहोचताच आईला संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पालकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. Pimpri Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा त्या सोसायटीतील कामाचा तो पहिलाच दिवस होता. अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन आणि विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक करताना त्यांच्या पार्श्वभूमीची सखोल पडताळणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. Pimpri Crime






