नाशिक : नाशिकमधील महात्मा नगर भागातील परिचारिका दीपाली अनिल पवार यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणात संशयित आरोपी असलेला तिचा पती आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक अनिल सोन्याबापू पवार याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याच्या पोलीस कोठडीत 11 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय देण्यात आला.

सुनावणी दरम्यान एका महत्त्वाच्या बाबीचा खुलासा झाला. दीपाली यांच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड बेकायदेशीरपणे काढण्यात आल्याचे समोर आले. हा सीडीआर कोणाच्या सांगण्यावरून काढण्यात आला, असा थेट प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. अनिल पवार यानेच आपल्या पदाचा गैरवापर करून हा रेकॉर्ड मिळवला असावा, असा संशय व्यक्त केला जात असून यामुळे तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दीपाली पवार या जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. 2014 मध्ये त्यांचा अनिल पवार याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर पती त्यांच्यावर सतत चारित्र्याचा संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा आरोप दीपाली यांच्या वडिलांनी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. याशिवाय दीपाली यांनी अहिल्यानगर येथे घेतलेला फ्लॅट दिराच्या नावावर करण्यासाठी त्यांच्यावर सतत दबाव आणला जात होता.

या त्रासाला कंटाळून 5 ऑक्टोबर रोजी दीपाली यांनी ‘अल्फोस पेस्टिसाइड’ हे विषारी औषध प्राशन केले. त्रास सुरू झाल्यावर त्या स्वतः दुचाकीने रुग्णालयात पोहचल्या. यावेळी अनिल त्यांच्यासोबत होता, परंतु त्याने उपचारासाठी पैसे न भरता त्यांना रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून पळ काढल्याचा गंभीर आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. नंतर भावाने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, दीपाली यांच्या मुलाने आईच्या छळाचा दावा करणारा एक व्हिडिओ बनवला होता, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. सध्या पोलीस या व्हायरल व्हिडिओची आणि बेकायदेशीरपणे काढलेल्या सीडीआर प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.






