पुणे: देशभरात महागाईचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असताना आता सणासुदीपूर्वी डाळींच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. साखर आणि खाद्यतेलाच्या दरातील वाढीनंतर आता हरभरा, तूर आणि मूग डाळी महाग झाल्याने घरगुती खर्चाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात डाळींचे दर प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी वाढले असून, किरकोळ बाजारात काही डाळींच्या किमतीत २० ते ३० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) घाऊक बाजारात गेल्या काही आठवड्यांपासून डाळींच्या पुरवठ्यात कमतरता जाणवत आहे. कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती आणि पिकांचे झालेले नुकसान यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुरवठा कमी झाल्याने घाऊक बाजारातील दर वाढले असून त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवरही दिसून येत आहे.

घाऊक बाजारातील दर पाहता हरभरा डाळीची किंमत यापूर्वी प्रतिकिलो ७२ रुपये होती. ती आता ८२ रुपयांवर पोहोचली आहे. तूर डाळीचा दर ९० रुपयांवरून १०५ रुपये झाला आहे. तर मूग डाळीची किंमत ९५ रुपयांवरून १०५ रुपये प्रतिकिलो झाली आहे.

किरकोळ बाजारातही ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. हरभरा डाळीचा दर ११० रुपयांवरून १३० रुपये प्रतिकिलो झाला आहे. तूर डाळीच्या किमतीतही वाढ झाली असून, ती १२० रुपयांवरून १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. मूग डाळीचा दर सध्या प्रतिकिलो १४० रुपये असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह देशातील काही भागांत पावसाची कमतरता आणि पीक उत्पादनातील घट यामुळे डाळींच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास किमतींवर आणखी दबाव येऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात डाळींचे दर कसे राहतात, याकडे ग्राहकांसह व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.







