पुणे: गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने मोठी कारवाई करत कुख्यात बाबा शेख गॅंगचा टोळी प्रमुख बाबा सैपन शेख आणि त्याचा साथीदार नंबरकारी आशिष अनिल कांबळे यांना अटक केली आहे. या दोघांकडून दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार बाबा सैपन शेख हा कोविड काळात पॅरोलवर बाहेर पडला होता. मात्र, पॅरोलचा कालावधी संपल्यानंतरही तो येरवडा कारागृहात हजर झाला नव्हता. त्यामुळे याबाबत येरवडा कारागृह प्रशासनाने पोलिसांना कळवले होते. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे औंध रुग्णालय परिसरात सापळा रचून त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.
बाबा सैपन शेख हा या टोळीचा प्रमुख असून त्याच्यावर तब्बल 15 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या आशिष कांबळे याच्यावर देखील दोन गुन्हे दाखल आहेत. या दोघांकडून मिळालेली पिस्तुले आणि काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.







