पुणे: सायबर चोरट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’चे भय दाखवून पुण्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल 24 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यामध्ये वारजे येथील 69 वर्षीय सेवानिवृत्त पोलीस अंमलदाराचाही समावेश असून त्यांनी वारजे पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजात जागृतीसाठी रिंग टोन प्रसारित केली होती. त्यामध्ये “डिजिटल अरेस्ट असे काही नसते” असे स्पष्ट करण्यात आले होते. या उपक्रमानंतर अशा फसवणुकीत काहीशी घट दिसून आली होती. मात्र, अलीकडच्या घटनेत पुण्यातील सुशिक्षित ज्येष्ठ नागरिक सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकले असून, एकप्रकारे ‘अमिताभ बच्चन’ यांचा पराभवच झाला असे म्हणावे लागेल.
9 ऑगस्ट रोजी फिर्यादींच्या पत्नीच्या मोबाईलवर प्रदीप जयस्वाल नाव सांगणाऱ्या व्यक्तीचा व्हॉट्सअॅप कॉल आला. त्याने स्वत:ला “डाटा फायनान्स ऑफ इंडिया”मधून बोलत असल्याचे सांगत फिर्यादी पती-पत्नींवर “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेशी संबंध” असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रींगची केस दाखल असल्याचे सांगत अरेस्ट वॉरंट काढल्याची खोटी माहिती दिली.
नंतर दुसऱ्या व्यक्तीने स्वत:ला “अँटी करप्शन डिपार्टमेंटचा वरिष्ठ अधिकारी” म्हणून ओळख करून दिली. फिर्यादींचा विश्वास बसावा यासाठी त्यांच्या नावावरील नोटिसाचा खोटा फोटो देखील पाठविण्यात आला. “तुम्ही रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहात, आम्ही मदत करू. पण तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ केले आहे आणि तुमच्या खात्याची पडताळणी करावी लागेल” असे सांगत आरोपींनी दबाव आणला. या धमकीला घाबरून सेवानिवृत्त अंमलदार आणि त्यांच्या पत्नीने 9 ते 13 ऑगस्टदरम्यान त्यांच्या बँक खात्यातील एकूण 24 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. त्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.







