Daund News दौंड , ता. 18 : कानगाव (ता. दौंड) येथे मोटार रिवाइंडिंग दुकानासमोर एका महिलेकडून जोरदार गोंधळ, शिवीगाळ आणि दगडफेक करण्यात आल्याची खळबळजनक घटना १५ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. “योगेश कोंडे कुठे आहे? त्याला मी सोडणार नाही,” असा संतप्त आरडाओरडा करत संबंधित महिलेनं दुकानात धुडगूस घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारात दुकान मालकाच्या भावाच्या हाताला दुखापत झाली असून, यवत पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Daund News
मनीषा लहु ताटे (रा. वरवंड, ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गणेश सुरेश कोंडे (वय 32, रा. गणेशवाडी, कानगाव, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी गणेश कोंडे यांचा भाऊ योगेश कोंडे याचे “दत्तकृपा एंटरप्रायजेस” नावाचे मोटार रिवाइंडिंगचे दुकान पाटस-कानगाव रोडवर आहे. योगेश कोंडे याच्यावर सध्या जिल्हाबंदी आदेश असल्याने तो अहिल्यानगर जिल्ह्यात वास्तव्यास असून, दुकानातील कामकाज कामगारांमार्फत सुरू आहे. Daund News
दुकानातील कामगार नवनाथ चौधरी यांनी गणेश कोंडे यांना फोन करून दुकानासमोर एक महिला आणि तिच्यासोबतचा व्यक्ती गोंधळ घालत असल्याची माहिती दिली. “योगेश कोंडे कुठे आहे?” अशी विचारणा करत महिला मोठमोठ्याने शिवीगाळ आणि धमक्या देत असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश कोंडे तातडीने दुकानाजवळ पोहोचले असता, काळ्या रंगाची अल्टो कार (एमएच 12 एस क्यू 1951) दुकानासमोर उभी होती. त्याठिकाणी मनीषा ताटे आणि तिच्यासोबत सचिन भोईटे उभे होते. Daund News
मनीषा ताटे ही अत्यंत आक्रमक अवस्थेत होती. “योगेश कोंडे सुप्रीम कोर्टातून जामिनावर बाहेर आला असेल, पण मी तुम्हाला सोडणार नाही,” असे म्हणत ती संताप व्यक्त करत होती. गणेश कोंडे यांनी शांततेने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. “वाद न्यायालयात सुरू आहे, कृपया दुकानाजवळ गोंधळ करू नका,” असे सांगितल्यावर महिलेचा संताप आणखी वाढला. तिने थेट गणेश कोंडे यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की सुरू केली. त्यानंतर जमिनीवर पडलेला दगड उचलून त्यांच्या दिशेने फेकला. स्वतःचा बचाव करण्यासाठी हात आडवा घेतल्याने दगड त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला लागून दुखापत झाली.
इतक्यावरच न थांबता संबंधित महिलेनं दुकानावरही दगडफेक केली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दुकान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित असलेले निरंजन फडके, नवनाथ चौधरी आणि ओंकार चौधरी यांनी हा संपूर्ण प्रकार पाहिल्याचे सांगितले जात आहे. घाबरलेल्या गणेश कोंडे यांनी थेट पाटस पोलीस चौकी गाठून तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी पाठवून घटनेची नोंद घेतली.
यानंतर यवत पोलीस ठाण्यात मनीषा लहु ताटे यांच्या विरोधात बीएनएस कलम 125(अ), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कानगाव परिसरात मोठी चर्चा सुरू असून, वैयक्तिक वादातून थेट दुकानात घुसून दगडफेक केल्याच्या प्रकारामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार फणसे करत आहेत.






