Crime : मुंबईतील धारावी परिसरात अंधश्रद्धा आणि कौटुंबिक संशयातून घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आपल्यावर जादूटोणा करत असल्याच्या संशयातून 58 वर्षांच्या एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच्या मुलालाच व्हिडिओ कॉल करून गुन्ह्याची कबुली दिली.

ही घटना 13 मार्च रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास धारावी कोळीवाडा येथील जांबा पास्कल चाळीत घडली. अमृत मेघा सोलंकी (वय 58) हे भंगार विक्रीचा व्यवसाय करत होते आणि ते पत्नी सूरजबेन सोलंकी (वय 52) यांच्यासोबत राहत होते. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 वर्षांपासून अमृत यांना पत्नी आणि मुलांबद्दल संशय होता. पत्नी आणि मुले मिळून जादूटोणा करत असल्याचा त्यांचा समज होता.
या संशयामुळे घरात वारंवार वाद होत होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात अमृत यांनी “एक दिवस तुझ्या आईला मारून टाकीन” अशी धमकीही दिल्याची माहिती मुलगा शिवराम सोलंकी (वय 33) याने दिली आहे.
घटनेच्या दिवशी दुपारी अमृत यांनी पत्नीच्या डोक्यात पाण्याची बाटली मारली आणि त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. काही वेळानंतर मुलगा शिवराम यांनी वडिलांना फोन केला असता त्यांनी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. कॉल सुरू होताच शिवराम यांना वडील रक्ताने माखलेले दिसले. त्यानंतर अमृत यांनी कॅमेरा फिरवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई दाखवत आपण तिची हत्या केल्याचे सांगितले.
हा प्रकार पाहून शिवराम यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सूरजबेन यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ही घटना अंधश्रद्धा, कौटुंबिक तणाव आणि मानसिक अस्थिरतेमुळे घडणाऱ्या गंभीर परिणामांचे उदाहरण मानली जात आहे.







