Ashok kharat : नाशिक, ता. 23 : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, या प्रकरणामुळे आता राज्यातील आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये अशोक खरात याची सखोल चौकशी सुरू असताना, त्याचे अनेक प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. Ashok kharat

महिलांचे लैंगिक शोषण, भोंदुगिरी आणि आर्थिक गैरव्यवहार अशा गंभीर आरोपांनी आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या खरात प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर एका बड्या पदाधिकाऱ्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याने प्रकरण आणखी चिघळले आहे. Ashok kharat :
फेडरेशन अध्यक्षपदाचा राजीनामा
समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते. मात्र, अशोक खरात आणि समता पतसंस्थेतील कथित संबंध उघडकीस आल्यानंतर सभासदांमध्ये असंतोष वाढला होता. राजीनाम्याची मागणी जोर धरताच, कोयटे यांनी अखेर पदत्यागाचा निर्णय घेतल्याचे समजते. राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अंतर्गत सुमारे 15 हजार पतसंस्था कार्यरत असून, हजारो सभासद या व्यवस्थेशी जोडलेले आहेत. 2015 पूर्वीपासून अध्यक्षपद भूषवणाऱ्या कोयटे यांच्यावर वाढत्या दबावामुळे त्यांनी पद सोडल्याची चर्चा आहे.
खाते व्यवहारांवर संशय
तपासादरम्यान अशोक खरात हा समता पतसंस्थेतील सुमारे 100 खात्यांचा नॉमिनी असल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहितीही पुढे आली आहे. विशेष म्हणजे, यापैकी अनेक खाती कोविड काळात ऑनलाईन पद्धतीने उघडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
कोयटे यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, आपल्यावर झालेल्या आरोपांना काका कोयटे यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. “मी अशोक खरातचा भक्त नाही आणि कोणत्याही भोंदूशी माझा संबंध नाही. एका कार्यक्रमात तो उपस्थित होता एवढाच संबंध आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच, संबंधित सर्व खाती केवायसी प्रक्रियेनंतरच उघडण्यात आली असून, ज्यांना आक्षेप आहेत त्यांनी पुरावे पोलिसांकडे द्यावेत, असेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Ashok kharat :






