Agriculture News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शेतकरी वर्गात तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. खातगाव गावाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तीने तब्बल 2 एकरवरील केळीची बाग कोयत्याने तोडून टाकल्याची घटना उघडकीस आली असून, यात शेतकरी भारत शंकर क्षीरसागर यांचं सुमारे 10 लाख आर्थिक नुकसान झालं आहे. मेहनतीनं उभ्या केलेल्या पिकाचा असा विध्वंस पाहून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

क्षीरसागर यांच्या शेतात मायक्रोसन जातीची सुमारे 2400 केळीची झाडं लागवड करण्यात आली होती. ही बाग उत्पादनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास शेतात घुसून झाडं कोयत्याने कापली. केवळ पिकंच नाही, तर केळीला पाणीपुरवठा करणारा ठिबक सिंचन संचही ठिकठिकाणी कापून टाकण्यात आला, ज्यामुळे नुकसान अधिकच वाढलं आहे. हा प्रकार केवळ आर्थिक हानी करणारा नसून, शेतकऱ्याच्या श्रमांवर आणि मानसिक स्वास्थ्यावरही घाला घालणारा आहे.
रविवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता, भारत क्षीरसागर हे दुसऱ्या शेतातील काम आटोपून संबंधित शेतात फेरफटका मारण्यासाठी आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. उभी बाग जमीनदोस्त झालेली पाहून त्यांनी तात्काळ नातेवाईकांना माहिती दिली आणि करमाळा पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून तपास सुरू असून, हा प्रकार वैरातून की मुद्दाम घडवून आणलेला आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
महत्त्वाचं म्हणजे, ही घटना एकटी नाही. गेल्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकांवर हल्ल्यांचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.बार्शी तालुका येथील कोरफळे गावात मेहनती शेतकरी किरण बर्डे यांच्या द्राक्षबागेवर रात्रीच्या अंधारात तणनाशक फवारण्यात आलं होतं, ज्यामुळे संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली होती. चांगलं उत्पादन येऊ लागल्यावर अशा प्रकारे पिकं नष्ट करण्याचे प्रकार वाढत असल्याचं चित्र चिंताजनक आहे.
या घटनांमुळे ग्रामीण भागात असुरक्षिततेची भावना वाढत आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि शेतकऱ्यांच्या पिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मेहनतीच्या घामावर उभ्या राहिलेल्या शेतीचं असं नुकसान रोखलं नाही, तर त्याचे परिणाम संपूर्ण कृषी व्यवस्थेवर होतील, असा इशाराही जाणकार देत आहेत.






