छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव वेगात आलेल्या कारने एका स्कुटरला जोराची धडक मारली असल्याची घटना समोर आली आहे. धडक इतक्या जोरात होती की, दुचाकी काही अंतरावर फेकली गेली आणि दुचाकीला धडक दिल्यानंतर कार महावितरणच्या विजेच्या खांबाला धडकली. धडक दिल्यानंतर चालक कार घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील हडको एन 13 भागात ही घटना घडली आहे. एका निळ्या रंगाच्या हुंदईची कार ही भरधाव वेगाने आली, त्याचवेळी समोरून एक स्कुटरवर तरुण जात होता. त्याला जोराची धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की, स्कुटरचालक दूर फेकला गेला आणि स्कुटर रस्त्यावर काही अंतर फरफटत गेली. स्कुटरला धडक दिल्यानंतर ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला धडकली. कार धडकेमुळे विजेच्या खांब अक्षरश: वाकला होता. त्यामुळे या भागातील विज दोन तास बंद पडली होती.

दरम्यान कारने दिलेल्या या धडकेमुळे स्कुटर चालक रस्त्यावर विव्हळत होता, पण स्थानिक लोकांनी धाव घेऊन स्कुटरचालकाला उचलून बाजुला केलं. लोक कारचालकाशी बोलत होते, पण त्याने मागे पुढे न पाहता घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस कार आणि चालकाचा शोध घेत आहे.
6:54 pm







